Friday, March 3, 2023

NSS Camp at Malkhed with Health check up under UBA

*मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर 2022-2023 यशस्वीपणे संपन्न...* 


मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मालखेड, तालुका: हवेली, जिल्हा : पुणे येथे दि. 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत यशस्वीपणे पार पडले.

या श्रमसंस्कार शिबिरामध्ये महाविद्यालयातील 17 विद्यार्थिनी आणि 36 विद्यार्थी असे एकूण 53 स्वयंसेवक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या शिबिराचे उद्घाटन दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 04 वाजता मालखेड गावच्या सरपंच श्रीमती नंदाताई लालदास जोरी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. याप्रसंगी मालखेड ग्रामपंचायतीचे सदस्य आणि प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक देखील उपस्थित होते.   

शिबिरादरम्यान गावात ग्रामविकासाचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये श्रमदान, ग्राम सर्वेक्षण, शाळा व मंदिराच्या ठिकाणी स्वच्छता, पथनाट्यातून समाज प्रबोधन, जलसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती, लिंगभाव संवेदनशीलता जाणीवजागृती, सामाजिक प्रबोधन, बौद्धिक चर्चासत्रे, सांघिक खेळ, गटचर्चा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माहितीपट व चित्रपटाचे प्रदर्शन देखील करण्यात आले.

शिबिरादरम्यान दररोज सकाळी 8:00 ते दुपारी 12:30 या वेळेत श्रमदान करण्यात आले. यामध्ये गावातील परिसर स्वच्छ करणे, स्मशानभूमी परिसरात स्वच्छता, गवत काढणे, गाळ काढणे, रस्त्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे इत्यादी कामे करण्यात आली.

शिबिरादरम्यान दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत बौद्धिक सत्रात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 'चित्रपटाची भाषा: सामाजिक आशय आणि आपली चित्रपटाची अभिरुची', पथनाट्यातून समाज प्रबोधन, 'चला, व्यसनाला बदनाम करूया, संघ बांधणी आणि व्यक्तिमत्व विकास, श्रद्धा व अंधश्रद्धा: सप्रयोग व्याख्यान' इत्यादी विषयांवर बौद्धिक सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रा. विशाल पवार, डॉ. अमित गोगावले आणि डॉ. विशाल गायकवाड, श्री संतोष पटवर्धन, डॉ. अजय दुधाने, प्रा. अमोल चौधरी आणि श्री नवनाथ लोंढे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.  

या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, संघ बांधणी, नेतृत्व गुण, भाषिक कौशल्य, समाजाप्रती संवेदनशीलता, एकता व एकात्मता इत्यादींचे धडे प्रत्यक्ष कृतीतून शिकायला मिळाले.

रासेयो स्वयंसेवकांनी ग्राम सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावातील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थिती जाणून घेतली.

दि.27 फेब्रुवारी रोजी शरयू मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, धायरी यांच्या सौजन्याने गावातील महिलांसाठी तसेच शाळेतील मुलींसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रा. सारंग एडके यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये शाळेतील मुलींची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली तसेच महिला व मुलींचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावातील माता व भगिनींसाठी हळदी- कुंकवाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. दि. 27 फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर करून समाजप्रबोधन केले.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. संपन्न झाला. याप्रसंगी मा. श्री. दत्ताभाऊ नलावडे (ज्येष्ठ इतिहास संशोधक व पत्रकार) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री नलावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या निगडी येथील शिवसृष्टी प्रकल्पाला विद्यार्थ्यांनी भेट देऊन शिवचरित्र समजून घेतले.
या एक आठवड्याच्या निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिरातून अंदाजे रक्कम रु. 1,50,000/- ची लोकहिताची कामे करण्यात आली, असे मालखेड ग्रामपंचायतीद्वारे प्रमाणित करण्यात येऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
शिबिर यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड, प्रा. सुशील गंगणे, डॉ. संदीप अनपट यांनी परिश्रम घेतले.

शिबिरादरम्यान प्रा. स्नेहल बोरकर, डॉ. कल्पना वैद्य, प्रा, कोमल गलांडे, प्रा. मनीषा शेवाळे, प्रा. सोमनाथ सराटे, डॉ. पूनम शिंदे, डॉ. अश्विनी पारखी, डॉ. स्वप्ना कोल्हटकर, प्रा. स्वप्निल कांबळे, प्रा. प्रमोद सपकाळ, प्रा. तुकाराम पाटील, प्रा. मंजिरी देशमुख, प्रा. योगिता रेणुसे, प्रा. सानिका कुलकर्णी, चारुशीला निगुडकर, श्री. मनोहर खाटपे यांचे विशेष सहकार्य लाभले. 
शिबिर यशस्वीपणे संपन्न होण्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला.


आपल्या मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पासून मालखेड, तालुका: हवेली, जिल्हा पुणे येथे सुरु असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची आज दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी यशस्वीपणे सांगता झाली. हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार सर, प्रा. एडके सर यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 

























No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.